सिल्लोड, (प्रतिनिधी): शहरास खेळणा मध्यम प्रकल्प पालोद येथे गुरुवारी (दि. ८) रोजी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार संयुक्त पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर संयुक्त पथकामार्फत खेळणा धरणातील अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्या सबंधीत शेतकरी व नागरीकांवर अचानक छापे मारुन त्यांच्या एकुण ६ व्हॉल्व आणि ११ पाईपलाईन जप्त करण्यात आल्या.
सिल्लोड शहराची सुमारे एक लाख लोकसंख्या असुन शहरास दैनंदीन पाणीपुरवठा खेळणा मध्यम प्रकल्प पालोद येथुन होत असुन यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खेळणा मध्यम प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होऊ शकला नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस संपले आहे. सध्यस्थितीत पावसाळ्यात पुरेसा पर्जन्यमान झाला नसल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज रोजी सकाळी ११ वाजता खेळणा मध्यम प्रकल्पावरुन शेतकरी व नागरीकामार्फत पंपाद्वारे अवैधरित्या पाणी उपसा होत असल्याचे प्रशासनाचे निदर्शनास आले होते.
त्याकरीता नगरपरिषद, सिल्लोड, महसुल विभाग, एमएसईबी व इरीगेशन विभाग यांचे संयुक्त पथका मार्फत युध्द पातळीवर कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तसेच भविष्यात देखील खेळणा मध्यम प्रकल्प पालोद व सिल्लोड शहरातील परिसरात असलेले धरण, तलाव व पाणीसाठा असलेले ठिकाणी देखील सदर पथकामार्फत अनाधिकृत पाणी उपसा करणाऱ्या नागरीकांवर पुर्वनियोजीत किंवा अचानक छापे मारुन कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.
खेळणा मध्यम प्रकल्प पालोद येथे ६ व्हॉल व ११ पाईपलाईन जप्त करतांना या प्रसंगी संयुक्त पथकात उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसिलदार सागर वाघमारे, नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी अजगर पठाण, सय्यद अय्युब, गणेश डोंगरे, जुबेर सिद्दीकी, विशाल वाघ, आकाश बनसोडे, देवेंद्र सुर्यवंशी, शहेबाज़ सय्यद व इतर कर्मचारी वृंद यांनी महसूल, नगरपरिषद आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त पथकामार्फत उपरोक्त प्रमाणे अचानक छापे मारुन कार्यवाही करण्यात आली.
तसेच भविष्यात देखील वेळोवेळी अशीच पुर्वनियोजीत व अचानक छापे मारुन कडक कार्यवाही करुन सबंधीत दोषी शेतकरी व नागरीका विरुध्द गुन्हा नोंद करण्यात येईल याची सर्व शेतकरी, नागरीकांनी नोंद घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी, नगरपरिषद, सिल्लोड यांनी केले आहे.















